Thursday, February 25, 2010

ब्लूम एनर्जीसर्व्हर

परवा सचिनच्या व्दिशतकाने आपल्या सर्वाचे लक्ष एका अजून महत्वाच्या बातमीकडे गेले नाही. सिलिकॉनव्हॅलीमधील एका अनिवासी भारतीयाने (के. आर. श्रीधर) स्थापन केलेल्या ब्लूमएनर्जी या कंपनीने आपले नवीन प्रॉडक्ट जाहिर केले, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जासंकट टाळणे शक्य होईल. पण ह्या प्रॉडक्टबद्दल जगात अजून प्रश्नच जास्त आहेत. पाहूया त्यातील काही प्रश्न...

१. हे एनर्जीसर्व्हर अखेर आले कुठून?
मंगळावरून, म्हणजे नासाच्या मंगळावर पाठवण्याच्या यानासाठी हे तंत्रज्ञान बनवण्यात आले. एनर्जीसर्व्हर नावाने आलेले हे खास बनावटीचे यंत्र, पेटंट घेण्यात आलेल्या ऑक्साईड फ्यूएल सेल तंत्रज्ञानाने बनवले गेले आहेत, जे इंधन जाळण्यापेक्षा रासायनिक प्रक्रीयेने ऊर्जा तयार करतात. जे जवळजवळ दुप्पट जास्त कार्यक्षम (efficient) आहेत. अशा सेल पासून २५ वॅट उर्जा मिळते, असे अनेक सेल एका एनर्जी-सर्वर मध्ये आहेत, जो १०० किलोवॅटची ऊर्जा देतो.

२. ह्यात खास काय?
दुप्पट कार्यक्षम (efficient) असलेले हे सर्व्हर ऊर्जा साठवण्याचे काम पण करतात सारख्याच ऊर्जा देणार्या सामान्य Generator पेक्षा खूपच कमी जागेत आणि इंधनात काम करतात.

३. ह्याला लागते काय?
मूळ प्रक्रीया हायड्रोकार्बनचे रासायनिक अपघटन करून ऊर्जा मिळवण्याची आहे. सध्या उपलब्ध एनर्जीसर्व्हर नैसर्गिक वायू तसेच बायोगॅसवर चालू शकतात.

४. कोण घेणार हे नवीन यंत्र?
अनेक कंपन्या ज्या ऊर्जेसाठी आधीच करोडो रुपये / डॉलर घालत आहेत, त्यांच्यासाठी 8,00,000 ते 10,00,000 USD देणे हा फायद्याचा सौदा आहे. गूगल, वॉलमार्ट, फेडेक्स, कोक, बँक ऑफ अमेरिका, इबे, स्टॅपल्स असे अनेक मोठे उद्योग ह्या एनर्जीसर्व्हरचे पहिले ग्राहक आहेत.

५. हे घरगुती वापराला येणार का?
सध्या नाही पण कंपनीचे म्हणणे आहे की घरगुती वापरालायक युनिट येत्या काही वर्षात तयार केले जाईल, आणि साधारणपणे $३००० ला मिळेल.

हे सर्व झाले तरीही काही प्रश्न अनुत्तरीत आहेतच...
जसे की
१. एनर्जी-सर्व्हरचे आयुष्य किती? प्रत्येक फ्युएलसेल चिरकाळ टिकणारी सांगितली जाते पण पूर्ण यंत्रणेचे आयुष्य हा एक प्रश्न आहेच.
२. ह्या एनर्जी-सर्व्हरमधून प्रदूषण फार कमी होत असले तरी खूप जास्त उष्णता तयार होते. ह्या जास्तीच्या उष्णतेचा वापर करण्याचे काही उपाय अजून तरी ब्लूमएनर्जी कंपनीने सांगितलेले नाहियेत.
३. ह्या यंत्राचा रखरखाव आणि कामातला खंड (maintenance) या गोष्टीचा काहीही उल्लेख कुठेही नाहीये. गूगलचे म्हणणे आहे की ही यंत्रणा जवळजवळ 98% वेळ काम करते. पण बाकीचे 2% ठराविक वेळेने येते का अचानक यावर कोणीच काहीही बोलत नाहिये. कारण एखाद्या उद्योगासाठी दिवसाचे 2% वेळ बंद पडणे फार धोक्याचे आहे.

हे ब्लूम एनर्जीसर्व्हर निश्चितच एक मोठे पाऊल आहे. पण जवळजवळ १०० अजून कंपन्या तरी अशा नक्कीच आहेत ज्या ह्या किंवा अशाच काही प्रॉडक्टवर संशोधन करत आहेत. आता असे वाटते की ऊर्जेचे प्रश्न आता अजून सहजपणे सोडवले जातील.











अधिक
माहितीसाठी पहा - http://www.bloomenergy.com
उपकरणाच्या अधिक माहितीसाठी पहा - http://c0688662.cdn.cloudfiles.rackspacecloud.com/downloads_pdf_Bloomenergy_DataSheet_ES-5000.pdf

1 comment:

  1. छान माहिती, मला ट्विटर वरनं मिळाली होती...
    हे आणि इतर संशोधनं जर जगासमोर यशस्वीरित्या आली तर पर्यावरणाचे आणि मानवाचे कल्याण होइल...

    ReplyDelete